माँसाहेब मीनाताई ठाकरे यांचा जयंती दिवस म्हणजे ममता दिन
आम्हा तमाम शिवसैनिकांच्या माऊली, वात्सल्यमूर्ती माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन🙏🙏🙏🙏
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांचा जयंती दिवस म्हणजे ममता दिन
शिवसैनिकांना आणि शिवसेनेच्या परिवाराला आईच्या मायेने, वात्सल्याने सांभाळणाऱ्या माँसाहेब मीनाताई ठाकरे यांचा जन्म ६ जानेवारी १९३२ रोजी झाला. मीनाताईचे पूर्वाश्रमीचे नाव सरला वैद्य असे होते. १३ जून १९४८ रोजी बाळासाहेब ठाकरे यांच्याशी विवाह झाल्यानंतर मीना ठाकरे असे नाव बदलण्यात आले. मीनाताईची माया साऱ्या घराला व्यापून उरलेली असे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन शिवसेनेचा झेंडा रोवला गेला. संघटनेच्या स्थापनेनंतर काही दिवसातच बाळासाहेबांनी रायगडाला जाऊन महाराजांच्या समाधीला वंदन केलं, त्यांच्याबरोबर मीनाताई आणि भगिनी सुशीलाताई गुप्ते उपस्थित होत्या. शिवसेना महिला आघाडीच्या महिला शाखेच्या स्थापनेसाठी त्यांनी कार्य केले.
सीमा प्रश्नसंदर्भात महाराष्ट्रात जे आंदोलन भडकले त्यामुळे बाळासाहेबांना अटक करून येरवडा मध्यवर्ती पाठविण्यात आले. बाळासाहेब तुरुंगातून आपल्या कुटुंबीयांना आणि मित्रांना नियमित पत्र लिहीत. खरंतर येरवडा तुरुंगात फोनची सोय होती परंतु मुंबईला केवळ ट्रंक कॉलनी संपर्क शक्य असे आणि ही सोय सहजी मिळत नसे. कुटुंबीयांशी, आप्त स्वकीयांशीयांची संवाद साधण्याचे एकमेव माध्यम म्हणजे पत्र. याप्रसंगी बाळासाहेबांनी मीनाताई यांनाही पत्र लिहिली. या पत्रामध्ये बाळासाहेबांनी मीनाताईंच्या धैर्याचं वर्णन केले आहे "तू गृह आघाडी उत्तम तऱ्हेने सांभाळीत आहेस हे वाचून मला समाधान वाटले" असा उल्लेखही त्यांनी केला आहे. याच पत्रामध्ये बाळासाहेबांनी सकाळ- संध्याकाळ रेडिओ ऐकताना नेस कॉफीची जाहिरात ऐकली की डिंगाचे शब्द आठवतात. मीनाताईंना मार्शल कडे लक्ष असू दे असंही सांगितलं आहे. या पत्रामध्ये बाळासाहेबांनी प्रसंग आला म्हणजे तो धीटपणा घेऊनच येतो असे म्हणत मीनाताईंच्या धैर्याचे वर्णन केले आहे.
२३ फेब्रुवारी १९६९ ला लिहिलेल्या पत्रामध्ये मीनाताईंना मुलांच्या शाळा,अभ्यास, परीक्षा याकडे लक्ष देण्यास सांगितले. तसेच त्यांचे SPOLAX औषध पावडर करून पाठवावे. येताना खाण्याचे पदार्थ फारसे आणू नयेत. खाण्याकडे कोणाचेही लक्ष नाही हे विशेष उल्लेख करून सांगितले. तुरुंगात असतानाही बाळासाहेबांनी मासाहेबांना काश्मीरमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचार बाबत माहिती घेण्यास सांगितले. तसेच दादांची काळजी घेण्यास सांगितले. विशेष म्हणजे पत्राच्या शेवटी कोपऱ्यामध्ये एक्वेरियमकडे लक्ष द्या की ही सूचना केली. मीनाताई या धाडसाने, धैर्याने साहेब तुरुंगात असताना डोळ्यात तेल घालून शिवसेना पक्ष भूमिका तसेच कुटुंब याकडे लक्ष देत होत्या. यावरूनच त्या आईच्या हळवेपणाने तसेच खंबीरपणे सर्व गोष्टी हाताळत असल्याचे आपल्या जाणवते.
२ मार्च १९६९ रोजी लिहिलेल्या पत्रामध्ये बाळासाहेबांनी मीनाताईंना शिवसैनिकांच्या भावनेने ओथंबलेल्या पत्राचा उल्लेख केला आहे. केवढी निष्ठा !!केवढे प्रेम!! हे पाहून आम्हाला गहिवरल्यासारखे होते असे ते म्हणतात. याच पत्रात बाळासाहेबांनी मीनाताईंना मृत्युंजय ही कादंबरी " तू ही वाच छान आहे!! असे म्हटले आहे.
१९७७ रोजी शिवसेना भवन ही दिमागदार वास्तू उभी राहिली या सेना भवनाच्या बाहेर मीनाताईंनी एक सुंदर रोप लावले होते. १९७९ रोजी बाळासाहेब आजारी पडले त्यावेळी या आजारातून साहेबांना लवकर बरे वाटावे म्हणून मीनाताईंनी साहेबांबरोबर अनेक होम हवन केले. बाळासाहेबांप्रमाणेच मीनाताईंचेही श्वानप्रेम उल्लेखनीय आहे. फ्री प्रेस जर्नल मध्ये नोकरी करत असताना बाळासाहेबांनी आपल्या मनाशी अमेरिकेला भेट देण्याचा निर्धार पक्का केला होता. फ्रीप्रेसचा महिन्याचा पगार पावणे दोनशे रुपये फक्त एवढ्या तुटकुंजा उत्पन्नावर हा नोकरदार माणूस अमेरिकेला भेट देण्याचे ठरवतो, याचं बाळासाहेबांच्या सहकाऱ्यांना आश्चर्य वाटत असे. काहींनी तर त्यांना वेडातच काढले परंतु आपल्या वॉल डिज्नीच्या अमेरिकेला एकदा जाऊन यायचं असं बाळासाहेबांनी ठरवून टाकलं होतं. १९८० साली बाळासाहेब मीनाताईंना घेऊन अमेरिकेला गेले.
मराठवाड्यातलं भूकंपग्रस्त लिंबाळा गाव शिवसेनेने दत्तक घेतलं या पुनर्वसन प्रकल्पाचे भूमिपूजन करताना मीनाताई बाळासाहेबांच्या बरोबर होत्या.
वृद्ध माणसांना त्यांची मुलं त्यांच्या असह्य वृद्धावस्थेत विचारत नाहीत. त्यामुळे त्यांना असह्य अवस्थेत रस्त्यावर यावं लागतं. अशा वृद्धांसाठी काहीतरी करावं असं मीनाताई ठाकरे च्या मनात होतं. मग खोपोली जवळ बाळासाहेबांनी वृद्धाश्रम उभा केला त्याचं नाव रमाधाम ठेवण्यात आलं.
नाशिक अधिवेशनात प्रचंड जनसागर जमला होता. यावेळेस मीनाताई आपल्या सुना नातवंडांबरोबर सभेला उपस्थित होत्या. याच अधिवेशनासाठी नाशिकच्या दिशेने येत असलेल्या एका वहानाला जबरदस्त अपघात झाला. त्यावेळी मीनाताईंनी बाळासाहेबांबरोबर जाऊन जखमी शिवसैनिकांची आईच्या मायेने विचारपूस केली. मीनाताईंनी बाळासाहेबांना “तुम्हाला सर्वात जवळची व्यक्ती कोण?” असा प्रश्न विचारल्याबरोबर बाळासाहेबांनी तात्काळ शिवसैनिक असे उत्तर दिलं या शिवसैनिकांची मीनाताईंनी कायमच मुलाच्या मायेने काळजी केली.
१९९५ विधानसभा निवडणूक काळामध्ये मीनाताई सातत्याने साहेबांना येणारे फोन घेऊ महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांशी संपर्क साधत असत. महाराष्ट्रामध्ये शिवसेना -भाजपाची सत्ता आली. यानंतर मीनाताई बाळासाहेबांबरोबर जाऊन श्री सिद्धिविनायक, श्री मंगेशा तसेच ठाकरे घराण्याचं कुलदैवत एकविरा देवीच्या देवळामध्ये दर्शनासाठी गेल्या. मीनाताई खूप धार्मिक,श्रद्धाळू होत्या पण त्यांच्या आजारपणामध्ये ही धार्मिकता त्यांच्या उपयोगी आला नाही, ही खंत बाळासाहेबांना नेहमी राहिली.
शिवसेना भवन हे शिवसेनेचे मुख्यालय शिवसेनेकडे सत्ता आल्यानंतर मंत्रालयाजवळ शिवसेनेचे नवीन कार्यालय उभे राहिले शिवालय त्याच्या उद्घाटन प्रसंगी ही मीनाताई उपस्थित होत्या. माँसाहेबांनी कुटुंबातल्या प्रत्येकाचं मोठ्या मनःपूर्वकतेने केलंच , त्याचबरोबर शिवसेनेचा विशाल गोतावळासुद्धा 'मातोश्री' त सामील झाला, त्याला कारण माँ ... माँच वागणं - बोलणं कमालीचं प्रेमळ अन् आपुलकीचं! कुठेही बेगडीपणा नाही, पोकळ बडेजाव नाही. संघटनेत कैकदा कार्यकर्त्यांच्या मनाची डागडुजी करावी लागते. माँसाहेब हे काम उत्तम प्रकारे करत.
६ सप्टेंबर १९९५ रोजी मीनाताई ठाकरे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने कर्जत येथे मृत्यू झाला. मीनाताई ठाकरे यांच्या मृत्यूनंतर असंख्य ज्ञात अज्ञात शिवसैनिकांना आपल्यावर मायेची पखरण करणारी आईच गेल्याचा धक्का बसला. गाड्या, बसेस, ट्रेनमधून अश्रू भरल्या डोळ्यांनी असंख्यानी त्यांच्या अंत्ययात्रेला गर्दी केली. बाळासाहेबांच्या मागे राहून निरंजनाप्रमाणे तेवणाऱ्या मीनाताईंच्यासाठी झालेली ही गर्दी स्वतःच्या पोरकेपणाची भावना दाखवणारी होती. माँसाहेबांनी बाळासाहेबांना राजकारणात नेहमीच खंबीर साथ दिली.
लेखन
प्रा. विद्या संतोष होडे
शिवसेना वक्ता
उपशहर प्रमुख शिवसेना महिला आघाडी पुणे
Comments
Post a Comment