*विठु माझा लेकुरवाळा II संगे गोपाळांचा मेळा II* 

   हा प्रसिद्ध अभंग लिहिणाऱ्या संत जनाबाई यांची आज पुण्यतिथी.  विनम्र अभिवादन🙏🙏

*नामयाची दासी* म्हणून घेण्यात धन्यता मानणाऱ्या संत जनाबाईंचा जन्म परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे दमा नावाच्या विठ्ठल भक्ताच्या घरी झाला . त्यांच्या वडिलांनी जनाबाईंना दामा शेठ शिंपी यांच्या पदरात टाकले तेव्हापासून त्या संत शिरोमणी नामदेव यांच्या कुटुंबातील एक घटक बनल्या.

  नामदेवांच्या सहवासात जनाबाईंनी विठ्ठलाच्या भक्तीचा ध्यास घेतला *दळीता कांडिता तुज गाईन अनंता* असे त्या म्हणत. संत नामदेव हेच त्यांचे पारमार्थिक गुरू होते. श्री संत ज्ञानदेव- विसोबा खेचर - संत नामदेव - संत जनाबाई अशी त्यांची गुरुपरंपरा आहे. संत नामदेवांविषयी त्यांचा भक्तिभाव अनन्यसाधारण होता. *परलोकीचे तारूI म्हणे माझा ज्ञानेश्वरूII* असे त्यांनी ज्ञानेश्वरांविषयी म्हटले आहे. संत जनाबाईच्या नावावर असलेले सुमारे ३५० अभंग सकल संत गाथा या ग्रंथात मुद्रित झाले आहे.

पांडुरंगाच्या गळ्यातील सोन्याचे पदक चोरल्याचा आरोप त्यांच्यावर घेण्यात आला त्यावेळी जनाबाईंनी मी सोन्यानाण्याची चोरी केली नाही तर मी विठूरायाची चोरी करून त्याला हृदय मंदिरात बंदिस्त केले आहे असे सांगणारा *धरिला पंढरीचा चोर* हा अभंग.

        दासी म्हणून काम करणार्‍या जनाबाईंच्या वाट्याला जे काबाडकष्ट आले त्या कामांमध्येही त्यांना प्रत्यक्ष विठुरायानी मदत केली.

        जनाबाईचे अभंग दूरदूरपर्यंत लोकप्रिय झाले आणि ही ख्याती कबीरांच्या कानावर गेली. इतके सुंदर अभंग रचणारी ही स्त्री कोण? या उत्सुकते पायी संत कबीर त्यांच्या भेटीला गेले.  त्यांच्या भेटीची ही कथा .....

    संत जनाबाई नदीकाठावर गव-या थापण्यासाठी गेल्या आहेत हे कळल्यावर त्यांनी नदीकाठी धाव घेतली. नदीच्या काठी दोन बायका भांडत होत्या. त्यांना संत कबीरांनी तुम्ही जनाबाईंना ओळखता का? असे विचारले असता. ती बाई म्हणाली हीच ती जनी... जिने माझ्या गव-या चोरल्या आहेत!! चोरटी कुठली !!! 

हे ऐकून संत कबीर भांबावून गेले. आपण ज्या जनाबाईंना भेटायला आलो त्या जनाबाई या नाहीत असे वाटून ते जायला निघाले. तेवढ्यात त्या दोन्ही बायकांनी आमच्या गव-या वेगळ्या करून द्या आणि मग जा,अशी विनवणी संत कबीर कडे केली.

सर्व गव-या दिसायला एकसारख्याच शेणाच्या गोल असल्यामुळे आता वेगळ्या कशा करणार? या अडचणीत असताना जनाबाई म्हणाल्या तुम्ही प्रत्येक गवरी कानाला लावून पहा ज्या गवरी मधून विठ्ठल!! विठ्ठल !! असा आवाज येईल ती गवरी माझी ज्या गवरीतून आवाज येणार नाही ती हिची असेल... इतकं सोप्प आहे हे.... खरच संत कबीर यांनी गवरी कानाला लावली आणि त्याच्यातून विठ्ठल!! विठ्ठल!! असा आवाज आला आपण ज्या जनाबाईंना भेटण्यासाठी इथे आलो ती आपली भेट खरंच सत्कर्मी लागली याची त्यांना मनोमन खात्री पटली. जनाबाईच्या गव-या सर्वाधिक होत्या आणि त्या बाईने जनाबाई वर खोटा आरोप लावला होता. संत जनाबाईंच्या नामस्मरणाची ताकद सांगणार ही घटना. 

संत मांदियाळीतील  संतांनी आपल्या नित्य कर्मामध्ये विठ्ठलाला पाहिले. कर्म करता करता नामस्मरण केले. 

*अरे विठ्या अरे विठ्या I मूळ मायेच्या कारट्या I उभी राहुनी अंगणी I शिव्या देत दासी जनी II* असे म्हणत जनाबाईनी विठ्ठलाशी भांडणही केले आहे.

*बाप  रकुमाबाई वर II माझे निजां चे माहेर II ते हे जाणा पंढरपुर II जग मुक्तीचे माहेर II* 

असे म्हणणाऱ्या संत जनाबाई च्या आठवणी आजही पंढरपुरामध्ये जतन केलल्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

प्रा. विद्या संतोष होडे

सावी

तुझ्या विना जाऊ शरण कुणा ?