संक्रांत साजरा करू असा..... सकारात्मकतेचा लुटू वसा
🪁🪁🪁 *सिद्ध साहित्यिका समूह आयोजित भव्यदिव्य लेख लेखनस्पर्धा*🪁🪁🪁
विषय --- *संक्रांत साजरा करू असा..... सकारात्मकतेचा लुटू वसा*
*तिळगुळ घ्या आणि पाठीमागे तरी गोड बोला* कारण तोंडावर तर सगळेच गोड बोलतात. हा मेसेज वाचला आणि मन विचारचक्रात गुंतून गेले. बदलत्या काळानुसार जशा परंपरा बदलल्या तसाच त्या परंपरेच्या अनुषंगाने असलेल्या वचनांचा ही संदर्भ बदलला हेच यातून लक्षात येते. संक्रांत म्हणजे संक्रमणाचा काळ. पौष महिन्यात येणारा शेतीशी निगडीत असा सण.
तीन दिवसाच्या या सणाचा पहिला दिवस म्हणजे *भोगी* शेतात उगवलेल्या ताज्या भाज्यांची केलेली लेकुरवाळी किंवा खेंगट भाजी हा या दिवशीचा विशेष खाद्यपदार्थ. बदलत्या जीवन पद्धतीनुसार, कार्यपद्धतीनुसार प्रत्येकाच्याच वैयक्तिक तसेच कौटुंबिक आयुष्यामध्ये भावनांची सरमिसळ झालेली आपण पाहतो. परंतु एखाद्या विशिष्ट भावनेचा (उदा. राग, तिरस्कार, संशय, हव्यास) अतिरेक झाला तर कुटुंब उद्ध्वस्त होताना आपल्याला दिसतात मला वाटते ही जी भाजी असते ती आपल्याला विविध भाज्यांची सरमिसळ योग्य प्रमाणात करून चविष्ट खाद्यपदार्थ बनविण्याची परंपरा जपताना प्रत्येकाच्या भावनांचे योग्य नियंत्रण करायलाच शिकवत असते. भावनांच्या नियंत्रणाद्वारे *सुखी कौटुंबिक जीवनाची शिदोरी* या सणाच्या निमित्ताने आपल्याला मिळत असते.
दुसरा दिवस म्हणजे *संक्रांत* या दिवशी स्त्रिया हळदी कुंकू , सुघड देतात. हळदी कुंकू हे एक निमित्त आहे.
यानिमित्ताने कौटुंबिक जबाबदारीतून काही वेळ काढून एकमेकींच्या साथीने सण आनंदाने साजरा करण्याच्या रिवाजाला प्राचीन स्त्रीच्या *चूल आणि मूल* या कोषातून बाहेर येण्याचा फार मोठा अर्थ आहे.
आजची स्त्री बाहेर पडली असली तरीही व्यावसायिक आणि कौटुंबिक जबाबदारी पेलत असताना होणारी भावनांची गुंतागुंत, जबाबदारीचे दडपण, मानसिक ताण तणाव या सर्वातून निवांतपणा मिळण्याच्या दृष्टीने हा हळदी-कुंकवाचा सण साजरा व्हावा असे मला वाटते. आपल्या *स्टेटस* नुसार चांदी, स्टील, प्लास्टिक यांच्या वस्तूंची लुट करत असतानाच सकारात्मकतेची, नवचैतन्याची, नवप्रेरणेची लूट होणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ स्त्रीउद्योजकता , योगासन, मनस्वास्थ्य, आत्मविश्वास वृद्धी याबाबत हळदीकुंकवाच्या निमित्ताने चर्चा घडून आली तर आपापसातील हेवेदावे, राग रुसवा या स्त्रीसुलभ गोष्टी मागे पडून खऱ्या अर्थाने स्त्री सक्षमतेचा हा सण साजरा होईल.
या सणाच्या दिवशी वस्तूदाना बरोबरच नेत्रदान, अवयवदान, वस्त्रदान, ज्ञानदान यांचेही दान देऊन समाजामध्ये नवीन दृष्टिकोन रुजवता येणार आहे.
पतंग उडवणे हे या सणाचे विशेष महत्त्व. पतंगाने आकाशामध्ये उंच भरारी मारण्यासाठी त्याचा दोर जमिनीवर घट्ट पकडून ठेवणे फार गरजेचे आहे. खेळाच्या भाषेत बोलायचे झाले तर दोर घट्ट न धरल्यामुळे *पतंग कटली* तर वाऱ्यावर सैरभैर उडत जमिनीवर येईल किंवा कुठेतरी अडकून राहील.
आपल्या आयुष्यातही शिक्षण, करिअर मानसन्मान, प्रतिष्ठा याच्यामागे उंच भरारी घेत असताना आपले कुटुंब, संस्कार, परंपरा यांचा दोर आपण घट्ट धरून ठेवला नाही तर आपली ही आयुष्य रुपी पतंग अशीच कुठेतरी आधांतरी राहील किंवा नैराश्याच्या गर्तेत अडकून पडेल. त्यामुळे हा सण आपल्याला आधुनिकता आणि परंपरा यांचा संगम साधत असताना कौटुंबिक जिव्हाळा जपण्याचा संदेश देतो.
तिसरा दिवस म्हणजे किंक्रांत. संक्रांतीदेवीने किंकरासुराचा वध करून त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले हे या दिवसाचे महत्त्व. आजच्या लहान मुलांना तसेच तरुण पिढीला हा संदर्भ माहिती नसतो. मोबाईल, लॅपटॉप, टॅबलेट, टीव्ही या तंत्रज्ञानाच्या पब्जी, ब्लू व्हेल्स, फ्री फायर यासारख्या गेम्सच्या जाळातून बाहेर काढून पुन्हा एकदा वाचन संस्कृतीकडे वळविणे, खेळ संस्कृतीकडे वळविणे संस्काराची जोपासना करणे या सणाच्या निमित्ताने साध्य होऊ शकते. एकमेकांना तिळगूळ देताना तीळ आणि गूळाप्रमाणे एकत्र होऊन स्नेह वाढवणे, दुरावलेल्या नात्यांमध्ये स्नेह प्रस्थापित करणे हेच या सणाचे महत्व आहे.
शब्दसंख्या---- *470*
लेखक --- *प्रा. विद्या संतोष होडे*
*हडपसर, पुणे*
मोबाईल नंबर --- *8830298843*
Comments
Post a Comment