स्वातंत्र्याची ऐसी तैसी
*स्वातंत्र्याची ऐसी तैसी*
*स्वातंत्र्या तुझी व्याख्या काय?* हे 'रोखठोक' वाचताना जे भारतीय संविधान न्याय, स्वातंत्र्य आणि समता या भक्कम पायावर उभे राहिले आहे त्याचीच केंद्रीय सत्तेकडून पायमल्ली होत असल्याचे दिसून येते.
सत्तेचा उपभोग हा केवळ वैयक्तिक हितासाठी घेण्याची वृत्ती बळावताना दिसत आहे. भाट आणि हुजरेगिरी करणाऱ्यांनाच सत्तेची मलई चाखायला मिळण्याची हल्लीची काही प्रकरणे पाहिली असता याच साठी का सामान्य जनतेने कमळ फुलवले हा प्रश्न पडतो?
नैराश्य आणि कौटुंबिक कलहामुळे आत्महत्या करणारा नट, आपल्या बेताल बोलण्याने मुख्यमंत्र्यांना अरे तुरे आणि शेतकरी आंदोलकांना भाडोत्री म्हणणारी नटी, लोकशाहीचा चौथ्या स्तंभाचा आक्रस्ताळी पत्रकार, अमली पदार्थांचा साठा करणारी विनोदी नटी यांच्यासाठीच केवळ केंद्रीय सत्ता, सर्वोच्च न्यायालय आहे का? दिल्लीच्या सीमेवर थंडीमध्ये न्याय्य हक्कांसाठी लढणारा शेतकरी हा या न्यायव्यवस्थेचा आणि सत्तेचा कोणीच नाही का यासारखे प्रश्न उभे राहतात.
स्वैराचार, स्वार्थ, सामाजिक अहित यांना कायदेशीर बंधने घालून स्वातंत्र्याचा उपभोग घ्यावा यासाठी संविधानाची निर्मिती केलेली आहे त्याचा विसर जर कोणाला पडत असेल तर भारतीय जनता स्वतःप्रत अर्पण केलेल्या या संविधानाचा योग्य तो हक्क आणि कर्तव्य बजावल्या शिवाय राहणार नाही. *ये जनता है ये सब जानती है*!!
*प्रा. विद्या संतोष होडे*
*पुणे*
Comments
Post a Comment