भारताची राष्ट्रीय प्रतिज्ञा
भारत हा बहुभाषिक, बहुसांस्कृतिक असा विविधतेने नटलेला देश आहे. परंतु या *विविधतेत एकता* आहे. भारताची राष्ट्रीय प्रतिज्ञा, राष्ट्रगीत, राष्ट्रीय ध्वज, राष्ट्रीय सण यामधून एकात्मतेचे दर्शन घडत असते.
शालेय जीवनापासूनच पाठ्यपुस्तकाच्या सुरुवातीलाच असलेली राष्ट्रीय प्रतिज्ञा आपण सर्वजण म्हणत आलेलो आहोत. "भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहे. माझ्या देशावर माझे प्रेम आहे". ही प्रतिज्ञा आपल्या सर्वांच्या अस्मितेचा आणि एकात्मतेचा अविभाज्य भाग आहे.
'वंदे मातरम' या राष्ट्रगानाचे लेखक बंकिमचंद्र चटर्जी व 'जनगणमन' या राष्ट्रगीतांचे लेखक रवींद्रनाथ टागोर यांची नावे आपल्याला परिचित आहेत. तसा नामोल्लेखही पाठ्यपुस्तकांमध्ये केलेला आहे. परंतु आपली राष्ट्रीय प्रतिज्ञा कोणी लिहिली आणि तिचा पाठ्यपुस्तकांमध्ये कधी समावेश करण्यात आला याबाबत आपल्या बऱ्याच जणांना काहीच माहिती नाही. आपल्या राष्ट्रीय प्रतिज्ञेतून विवेकवादी, समतावादी, एकात्म समाज घडविण्याचा आदर्श विचार मांडलेला आहे. या अमूल्य वारशाचे जतन भविष्यातील पिढ्यांसाठी आपण करणारच आहोत. यासाठी या प्रतिज्ञा लेखकाचा हा परिचय ......
आंध्र प्रदेशातील सुप्रसिद्ध तेलगू साहित्यिक *पेदेमरी व्यंकट सुब्बाराव* यांनी 1962 मध्ये तेलगू भाषेत ही प्रतिज्ञा लिहिली. ते आंध्र प्रदेशच्या नालगोंडा जिल्ह्यातील अन्नेपथीं गावचे राहणारे होते. संस्कृत, इंग्रजी आणि अरेबिक भाषांमध्ये पदव्युत्तर पदवी पर्यंतचे त्यांचे शिक्षण झाले होते. ते विशाखापट्टणम या जिल्ह्याचे अनेक वर्ष 'जिल्हा कोषागार अधिकारी' म्हणून सरकारी नोकरीत होते. त्यांच्या काही कादंबऱ्या ,कथासंग्रह ,कविता सुद्धा गाजले होते. मुळात राष्ट्रप्रेमाने प्रेरित झालेले, स्वातंत्र्यचळवळीत सहभाग घेतलेले कवी पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी आपल्या जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी म्हणावी म्हणून एक प्रतिज्ञा 1962 मध्ये लिहिली. त्यांच्या एका शिक्षण खात्यातील मित्राला ही कल्पना खूप आवडली. त्याने आंध्रप्रदेशचे तत्कालीन शिक्षणमंत्री पी. व्ही. जी.राजू यांच्याकडे ही प्रतिज्ञा पाठवली. शिक्षणमंत्र्यांनी ही प्रतिज्ञा शाळांमध्ये घेण्याचा आदेश दिला.
केंद्र सरकारच्या नेतृत्त्वात मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अंतर्गत देशातील शिक्षण खाते काम करत असते. या खात्याच्या वतीने शिक्षणामध्ये सातत्याने नवनव्या सुधारणा सुचविल्या जातात. यासाठी डेव्हलपमेंट ऑफ एज्युकेशन इन इंडिया या समितीची स्थापना केलेली असते. या समितीचे अध्यक्ष केंद्रीय शिक्षणमंत्री असतात. या डेव्हलपमेंट ऑफ एज्युकेशन इंडियाची एकतिसावी मीटिंग तत्कालीन केंद्रीय शिक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली 11 आणि 12 ऑक्टोबर 1964 मध्ये बेंगळुरू येथे झाली. या मिटिंगच्या वृत्तांत मध्ये Development of Education in India:Historical Survey of Educational Documents before and after Independence या पुस्तकाच्या पान 140 वर मुद्दा क्रमांक 18 मध्ये उल्लेख आढळतो की, विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय भावना सदोदित राहण्यासाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये तसेच राष्ट्रीय दिवसांच्या शुभपर्वावर विद्यार्थ्यांसाठी एक प्रतिज्ञा असावी. याकरिता पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी लिहिलेल्या India is my country, All Indians are my brothers and sisters............ ही प्रतिज्ञा देश पातळीवर स्वीकारण्याची शिफारस करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. पुढे असे सूचित करण्यात आले की, ही प्रतिज्ञा देश पातळीवर 26 जानेवारी 1965 पासून सर्वत्र लागू करावी. या प्रतिज्ञेचे देश पातळीवर विविध भाषांमध्ये भाषांतर करण्यात आले आणि 1965 पासून देशातील सर्वच राज्यांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये तिचा समावेश करण्यात आला. या प्रतिज्ञेला फक्त पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञेचा दर्जा न देता तिला राष्ट्रीय प्रतिज्ञेचा दर्जा देशपातळीवर देण्यात आला. पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी ही प्रतिज्ञा 1965 मध्ये प्रथम तेलगू भाषेत लिहिली होती. 26 जानेवारी 2012 ला या प्रतिज्ञा चे सुवर्णमहोत्सवी वर्ष सुब्बाराव यांच्या मित्रपरिवाराने साजरे केले तेव्हा 'टाइम्स ऑफ इंडिया' आणि 'दैनिक हिंदू' या राष्ट्रीय वृत्तपत्रात छोटीशी बातमी प्रकाशित झाली.
लेखिका
प्रा विद्या संतोष होडे
हडपसर विधानसभा समन्वयक शिवसेना महिला आघाडी
एम ए एम एड. डी एस एम. बी जे (प्रिंट मीडिया)
संस्थापक अध्यक्षा: सावी बहुउद्देशीय सामाजिक संस्था

Comments
Post a Comment