भारतीय जैन संघटना महाविद्यालय

ही आवडते मज मनापासुनी शाळा लाविते लळा जशी माऊली बाळा ||

या उक्तीप्रमाणे बालपणी जशी शाळा आवडत असते तसेच कुमार वयामध्ये आल्यानंतर आपली पाऊले नव्या आशा, आकांक्षा, उत्साह , उमेद घेऊन महाविद्यालयामध्ये प्रवेश करतात.

       महाविद्यालयीन जीवन तुम्हाला तुमच्या पुढील व्यावसायिक, व्यावहारीक आणि सुजाण नागरिकत्वा साठी तयार करत असते.

असे म्हणतात, इमारतीचा पाया भक्कम असेल तर इमारत मजबूती ने डौलाने उभी राहते. बालपण जर पाया असेल तर महाविद्यालयीन जीवन त्या इमारती वर चढणारा एक एक मजला आहे. इमारत किती भव्यदिव्य बनवायची हे त्या महाविद्यालय जीवनात मिळणाऱ्या अनुभवातून ठरत असते.

    केवळ बौद्धिक ज्ञान मिळविणे हाच महाविद्यालय जीवनाचा उद्देश नसतो किंबहुना तो नसावा. म्हणूनच मी मला भाग्यशाली समजते कि, मी भारतीय जैन संघटना या महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे.

     2002 ला  एस वाय बी ए  मराठी स्पेशल विषय निवडून मी महाविद्यालयात प्रवेश घेतला. 

प्रा.आवटे सर यांचे मराठी विषयाचे व्याकरण, संत साहित्याचा अभ्यास, बालकवींचे काव्य, भाषाविज्ञान, साहित्य सिद्धांत आणि समीक्षा या विषयांचे अध्यापन कार्य पुढे एम ए करता नाही नेहमी स्मरणात राहिले.

'विद्रोही तुकाराम' या पुस्तकाचे वाचन करून वर्गामध्ये लेक्चर देण्याची संधी प्रा.आवटे सरांनी मला दिली. त्यामुळे माझ्यातील आत्मविश्वास आणि विषय मांडण्याची कला मला पुढे बीएड करतानाही फार उपयोगी ठरली.

"नाही निर्मळ मन

काय करील साबण"

"दगड धोंड्यांना नवस करता पुत्र प्राप्त होती

तर बाईस नवरा का लागती"

     पुस्तकातील या ओळी पुढे अंधश्रद्धा निर्मूलन समाजजागृती या विषयांवर व्याख्यान देताना उपयोगी ठरल्या.प्रा. आवटे सर यांनी सकाळ वर्तमानपत्राच्या 'कॉलेज कट्टा'या सदरामध्ये लेखन करण्यास प्रोत्साहित केले त्यामुळे पुढे विविध विषयांवर लेख लिहिण्याची विचार करण्याची सवय निर्माण झाली. कॉलेज जीवनामध्ये वृत्तपत्रांमध्ये छापून आलेल्या त्या लेखांमुळे माझ्यातील लेखिका आजही जिवंत आहे.

प्रा.धिवार सर यांचे दलित साहित्य, मराठी लोकसाहित्य, ग्रामीण साहित्य विषयाचे अध्यापन उल्लेखनीय होते.

बाबुराव बागुल यांच्या'सूड'या कादंबरी चा अभ्यास करत असताना दलित साहित्यातील वेदना, नकार आणि विद्रोह या तीन मूळ तत्वांचे त्यांनी केलेले विश्लेषण नेहमी स्मरणात आहे. 'पाणी' या बा. सी. मर्ढेकर यांच्या कादंबरीतील"पाखराने उंच आकाशामध्ये भरारी घ्यावी यश आले तर चांगलेच पण अपयश आले तर आम्ही आहोतच की पाठीशी" या वाक्याने आयुष्यामध्ये अपयशाची भीती मनात कधी आलीच नाही.

दलित साहित्यातील 'आत्मकथन'हा साहित्य प्रकार वाचनामध्ये आला आणि समाजातील एका विशिष्ट वर्गाच्या वाट्याला आलेले जिणं, हाल-अपेष्टा यांची जाणीव झाली. आपण किती सुखवास्तू जीवन जगत आहोत याची जाणीव झाल्याने पुढे आयुष्यात यश मिळवायचे असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही हे बीजारोपण महाविद्यालयीन जीवनातच केले गेले.        

        केवळ पुस्तकी ज्ञानावर भर न देता आपल्या विद्यार्थ्यांनी मराठी साहित्याचे वाचन केले पाहिजे ग्रंथालयांमध्ये जास्तीत जास्त वेळ दिला पाहिजे या उद्देशाने या दोन्ही प्राध्यापकांनी आमच्यावर खूप मेहनत घेतली.

 "मृत्युंजय" या शिवाजीराव सावंत यांच्या कादंबरीच्या वाचनासाठी  विद्यार्थिनींमध्ये स्पर्धाच लागली होती एखादी व्यक्ती फॅशनच्या बाबतीत जितकी वेडी असेल तितके वेड आम्हाला या कादंबरीने लावले होते.  मृत्युंजय कादंबरीतून काढलेल्या नोट्स जीवनाला प्रेरणा देणाऱ्या ठरल्या.

"अश्रू हे दुबळ्या मनाचे प्रतीक आहे"

या वाक्याने एक मुलगी म्हणून आणि आत्ता एक स्त्री म्हणून , एक आई म्हणून नेहमीच कणखरपणा, सहनशीलता आणि प्रसंगी येणाऱ्या हळवेपणातून स्वतःला सावरण्याची ताकद महाविद्यालयीन काळातील वाचनामुळे मिळाली.

मुनवर शहा यांचं एस आय ॲम गिल्टी या आत्मचरित्रातील "तारुण्याला अहंकाराचा शाप असतो आणि तो माणसाचा विनाश केल्याशिवाय राहत नाही"हे वाक्य पुढील आयुष्यात नेहमी नम्रता समोरच्याचं ऐकून घेण्याची क्षमता समजूतदारपणा हे गुण विकसित करणारे ठरले.

महाविद्यालयाची वेळ सकाळी सात ते बारा असली तरी ग्रंथालयामध्ये बसून पुस्तक वाचन करण्यासाठी कधीच वेळेचे बंधन पाळले नाही. 

मराठी विषयाचे आमचे ज्ञान सखोल होण्याच्यादृष्टीने 27 डिसेंबर 2002 रोजी "मराठी साहित्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोण"या विषयावर आयोजित चर्चासत्र आणि त्यात आम्ही मराठी विषयाच्या विद्यार्थिनींनी घेतलेला सक्रिय सहभाग आजही आठवतो.

भारतीय जैन संघटना या महाविद्यालयाचे लायब्ररी 2000 मध्ये पुस्तकांनी इतकी परिपूर्ण होती ही कधीही पुणे विद्यापीठाची कमी जाणवली नाही. 2007 मध्ये ज्या वेळेस पुणे विद्यापीठाच्या जयकर लायब्ररी मध्ये जाण्याची संधी मिळाली त्यावेळेस मराठी विभागाच्या लायब्ररी मध्ये असणारा पुस्तकांचा साठा 2000 साली वाघोली येथील ग्रामीण भागातल्या कॉलेजमध्ये मिळाल्याचा आनंद काही औरच होता.

इतिहास हा विषय केवळ घटना, सण सनावळ्या यांच्या पाठांतराचा विषय हा समज दूर करून इतिहासातील रंजकतेकडे ,गौरवपूर्ण घटनांकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन प्रा.फडतरे सर यांनी आम्हा विद्यार्थ्यांना दिला. सरांचे अठराशे सत्तावनचे बंड,पानिपतचे महायुद्ध, दुसरे महायुद्ध, रशियन राज्यक्रांती या विषयांचे अध्यापन, फलकावर लिहिलेले मुद्दे आजही डोळ्यासमोर येतात.  प्रा. फडतरे सर यांचा हाच आदर्श मी स्वतः इतिहास विषयाची शिक्षिका झाल्यानंतर ठेवला.

     प्रा. शिंदे सर यांचे  सकाळचे पहिले लेक्चर अर्थशास्त्राचे कधीही बुडविले नाही. कारण भारतीय अर्थव्यवस्था मंदी , तेजी , रुपयाचा भाव बेरोजगारीची कारणे , व्यापार याविषयीचे सरांचे अभ्यासपूर्ण विश्लेषण नेहमीच आम्हाला आवडायचे.

   इंग्रजी विषय केवळ मार्क मिळवण्यासाठी न अभ्यासता त्यातील इंटरव्यू, लेटर रायटिंग, न्युज रायटिंग या विषयाची  मॅडमनी घेतलेली तयारी नंतर विविध क्षेत्रामध्ये इंग्रजीचा अडसर दूर करणारी ठरली.

 बीए ला असतानाच मी स्पोकन इंग्लिश चा क्लास जॉईन केल्यामुळे इंग्रजी वरचे प्रभुत्व इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये तसेच इंग्रजी माध्यमाच्या डीएड कॉलेजला अध्यापन करताना फार उपयोगी ठरले.

    कॉलेजच्या तृतीय वर्षाला असताना शिक्षक दिनाच्या निमित्ताने प्राचार्य निवडीसाठी घेण्यात आलेली निवड परीक्षा आणि दत्ता माने यांची प्राचार्य म्हणून झालेली निवड लक्षात आहे. प्राचार्य होण्याची संधी हुकली तरीही मराठी विषयाचे अध्यापन करण्याची संधी मी सोडली नाही.

  भारतीय जैन संघटना या महाविद्यालयातील ज्ञानाच्या समृद्धीबरोबर  2002 आणि 2003 साली भावडी येथे झालेले राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबीर आमच्या शारीरिक, भावनिक, बौद्धिक कौशल्य विकासाला मार्गदर्शक असेच होते.

Tell me the song on the tongue  of youth and I will tell you the future of nation.

या उक्तीप्रमाणे महाविद्यालयीन तरुण-तरुणींच्या सळसळत्या उत्साहाला, रक्ताला, त्यांच्यातील ताकदीला  सकारात्मक बनविण्यासाठी घेण्यात आलेले राष्ट्रीय सेवा योजना शिबिर आमच्या जीवनाचा आदर्श ठरले. प्रा.मोरे सर यांचे यासाठी विशेष कौतुक करावे तितके थोडे आहे.

    दिवसभर श्रम दान केल्यानंतर संध्याकाळी असणारे मनोरंजनाचे कार्यक्रम हे केवळ थिल्लर मनोरंजन न ठरता विद्यार्थ्यांच्या बुद्धीला, भावनेला, त्यांच्यातील कल्पकतेला, कलात्मकतेला चालना देणारे ठरले. पथनाट्य सादर करण्यासाठी देण्यात आलेले विषय अंधश्रद्धा, स्त्री शिक्षण, व्यसनमुक्ती, शहरीकरण, बेरोजगारी यांचे सादरीकरण करताना प्रत्येक ग्रुपमधील सदस्य तितकाच पुढाकाराने आपला सहभाग नोंदवत होता.प्रा. राम निवळीकर यांचे भावडी येथील शिबिरातील व्याख्यान  स्मरणात राहण्यासारखे आहे. प्राचार्य राजेंद्र कांकरिया यांनी आदर्श नेहमी दुसऱ्यांचा घ्यावा आणि स्पर्धा स्वतःशी करावी हे मार्गदर्शन नेहमीच लक्षात राहण्यासारखे आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर सादर केलेले पथनाट्य ग्रामीण भागातील लोकांचे प्रबोधन करणारे ठरले.

एका पथनाट्याच्या सादरीकरणामध्ये व्यसनाधीन झालेल्या मुलाच्या आईची भूमिका करताना त्याच्या कानाखाली मारलेली थापड तेथील सरपंचांच्या ही कौतुकास पात्र ठरली. पथनाट्य तील पात्र सादरीकरणामध्ये असलेले वैविध्य आणि अभिनयाची चुणूक समोरच्या प्रेक्षकांची नेहमीच दाद मिळवत होते.

2002 साली  राष्ट्रीय सेवा योजनेच्या  शिबिरामध्ये  पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे ग्रुप बनविताना दहा विद्यार्थ्यांच्या ग्रुपमध्ये माझ्या एकटीचा समावेश झाला हे सर्व विद्यार्थी होस्टेलचे असल्यामुळे त्यांना फक्त मुलांचा ग्रुप हवा होता आणि त्यांना काहीही करून मला त्या ग्रुप मधून बाहेर काढायचे होते परंतु दोन तीन दिवसानंतर त्यांच्या आणि माझ्यात जे मैत्रीचे बंध निर्माण झाले त्यामुळे आमचा तो ग्रुप शिबिराचे दहा दिवस नेहमीच उल्लेखनीय कामगिरी मध्ये नंबर एक राहिला आणि आजही त्या ग्रुपमधील आम्ही सगळे आमच्या आमच्या क्षेत्रांमध्ये नंबर एकच आहोत जसे की, प्रा. लिंबाजी प्रताळे, वैरागकर बंधू, ॲड. राजीव भोंबे, संदीप पाटील, प्रमोद गोरे, प्रसाद सोनवणे, गणेश बाबर. आजही आमच्यातील हे मैत्रीचे बंध टिकून आहे. आरती, अरुणा, सुनंदा ,जयश्री सुरेखा, सोनाली, सुनिता या मैत्रिणींनीही मला खूप समृद्ध केले. महाविद्यालय जीवनातली स्लॅमबुक उघडली तर आजहीआपल्याबद्दल मित्र-मैत्रिणींनी लिहिलेल्या कविता चारोळी मनातील भावना वाचल्या की आपल्यातील अल्लडपणाची आठवण येऊन आपसूकच गालावर हसू उमटते. मराठी विषय स्पेशल असणारी मी एकमेव मुलगी भावडीच्या दोन्ही वर्षी राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरात सहभागी होते.

सुरेखा थिटे तिला पथनाट्य मध्ये शिक्षिकेची भूमिका पार पाडण्यासाठी केलेली मदत दिलेले प्रोत्साहन माझ्या आजही लक्षात आहे. डीएडच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन प्रेरणा देताना या स्वभावगुणांचा मला फार फायदा झाला. 

डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांनी भारतीय जैन संघटना संकुलास दिलेली भेट आणि विद्यार्थ्यांची साधलेला संवाद ही एकट्या काळातील पर्वणीच होती. स्वप्न पाहणे हा गुन्हा नाही तर छोटी स्वप्न पाहणे हा गुन्हा आहे.त्यामुळे मी मोठी स्वप्न पहा आणि ती साध्य करण्यासाठी सतत कार्यरत रहा हा संदेश विद्यार्थिदशेत असताना मिळालेला मोलाचा संदेश होता.

   महाविद्यालयाने जसे ज्ञानाने समृद्ध केले तसेच या मैत्रीच्या समृद्धी ने ही आयुष्य व्यापून उरले आहे. माझ्या सर्व मित्रमंडळींना माझी आई आजही खूप आठवणीत आहे.

रुद्राक्ष वैराकर याने आईची ओळख करून देताना, "माझी आई माझी आई असं न म्हणता आपली आई म्हणत जा". हा एक नवा विचार दिला त्यामुळे पुढील आयुष्यातही कुटुंबात कोणत्याही महाविद्यालयात, शाळेमध्ये किंवा एखाद्या ठिकाणी व्याख्यानाला जाताना समोरचे विद्यार्थी, प्रेक्षक यांच्यात हे आपलेपणाचे नाते निर्माण करण्याची माझी सवय सर्वांनाच भावते. भारतीय जैन संघटनेच्या वस्तीगृहातील आमचे वर्गमित्र आणि आम्ही स्थानिक विद्यार्थी यांच्यात नेहमीच एक आपुलकीचे स्नेहाचे नातेसंबंध होते आणि आजही हा मैत्रीचा धागा असाच टिकून आहे.

   महाविद्यालयीन जीवनामध्ये वक्तृत्व, कथाकथन ,निबंध लेखन, काव्यवाचन अशा अनेकविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची आणि महाविद्यालयाचा नावलौकिक वाढविण्याची संधी मला मिळाली.

लोणावळा येथे यशवंतराव चव्हाण स्मृती निबंध स्पर्धेमध्ये पुणे विद्यापीठात माझा प्रथम क्रमांक आला. या स्पर्धेतील माझा विषय "जीवनशैली-एक चिंतन"आणि या विषयाने माझ्या जीवनाला खऱ्या अर्थाने कलाटणी दिली. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्यांचा त्यावेळी घेतलेल्या मतितार्थांनी मला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून दिला. या स्पर्धेचे पारितोषिक मला पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्रा. चाकणे सर यांच्या हस्ते मिळाले. तेथे त्यांनी "ही विद्यार्थिनी आमच्या भारतीय जैन संघटनेची आहे "असे उद्गार काढले त्यावेळेस मला फार आनंद झाला. पुढे 2007 मध्ये एम.एड अभ्यासक्रमाच्या निरोप समारंभाच्या वेळी प्रा. डॉ. चाकणे सरच प्रमुख पाहुणे होते. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी महाविद्यालयामध्ये आल्यानंतर माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींनी माझे केलेले कौतुक आणि नंबर एक किती महत्त्वाचा आहे याची झालेली जाणीव कधीही विसरणार नाही.लोकमान्य टिळकांच्या 83 व्या पुण्यतिथीचा दिवस महाविद्यालयामध्ये"आईचा दिवस"म्हणून साजरा करण्यात आला यावेळी आई या विषयावर कविता वाचन करण्याची संधी मला मिळाली.

चिंचवड येथील भारतीय जैन संघटनेच्या शाखेमध्ये विज्ञान शाप की वरदान या विषयावरील वकृत्व स्पर्धेमध्ये माझा द्वितीय क्रमांक आला.

राजगुरुनगर येथील महाविद्यालयातील शांता शेळके एक कवियत्री या विषयावर वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मला मिळाली. बीए महाविद्यालयामध्ये प्रथम येण्याची संधी मला मिळवता आली याचा मला फार आनंद आहे.आम्ही महाविद्यालयात असताना प्राध्यापक या पदावर असलेल्या आमच्या सर्व शिक्षकांनी आज डॉक्टरेट ही पदवी मिळवली आहे याचा आम्हाला खूप अभिमान आहे.

 ||अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती 

दोन दिसांची रंगत संगत दोन दिसांची नाती||

सुधीर फडके उर्फ बाबूजी यांचे गीत खरंच किती सार्थ आहे. कॉलेजचे ते दोन वर्ष कसे भरकन निघून गेले पण आजही नगर रस्त्यावरून जात असताना महाविद्यालयाच्या आजुबाजूला वाढलेले सिमेंटचे जंगल पाहिले की लांबूनच महाविद्यालयाच्या वस्तीगह इमारतीवर असणारा आईस्क्रीमचा कोन  आमचे लक्ष वेधून घेतो आणि जुन्या दिवसांची आठवण करून देतो.

लेखक ---- प्रा. विद्या संतोष होडे

(एम ए. एम एड.डीएसएम,बीजे-प्रिंट मीडिया )

Comments

Popular posts from this blog

प्रा. विद्या संतोष होडे

सावी

तुझ्या विना जाऊ शरण कुणा ?