कोरोना काळात बदललेले विवाहाचे स्वरूप
*कोरोना काळात बदललेले विवाहाचे स्वरूप रूप पाहता*
१)आपल्या भारतीय संस्कृती मध्ये विवाह हे केवळ दोन व्यक्तींचे होत नसतात तर तो एक आनंदाचा उत्साहाचा आणि नातेवाईक मित्रमंडळी आप्तेष्ट यांनी एकत्र येण्याचा चांगला योग असतो. त्यामुळे सामाजिक शिस्तीचे, आरोग्याचे भान पाळून सर्वांनी एकत्र येणे यासाठी विवाह हे एक उत्तम कारण आहे.
२) *नवरा येतो नवरी साठी वऱ्हाडी येतात जेवणासाठी* त्यामुळे लग्नप्रसंगी होणारे अन्नदान हे आपल्या विवाह संस्कृती चे उत्तम उदाहरण आहे. परंतु केवळ अति श्रीमंतीचे स्टेटस विचार करून लग्नप्रसंगी चे विविध पदार्थ चे स्टॉल बुफे डिनर ठेवले जाते त्यामुळे अन्नाची मोठ्या प्रमाणामध्ये नासाडी होते कोणताच पदार्थ व्यवस्थित न खाता ताटामध्ये अनेक पदार्थ वाढून घेऊन ते वाया घालवले जातात. त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीतील *पंगत* ही पद्धत आदर्श आहे आणि ती पुढील काळातही चालू रहावी असे मला वाटते.
३) लग्नपत्रिका छपाई मध्ये आलेली विविधता ही कलाकुसरीची बाब असली तरी त्यावर होणारा खर्च आणि पत्रिकावाटप या कालावधीमध्ये होणारी धावपळ, अपघात तसेच पत्रिका न मिळाल्यामुळे होणारी नाराजी आणि पर्यावरणाची हानी याचा विचार करता आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये *डिजिटल पत्रिका* हा पर्याय सर्वांनी स्वीकारणे काळाची गरज आहे.
४) वधू-वरांच्या कुटुंबाच्या मनामध्ये असणारे समाज काय म्हणेल? आपले नातलग काय म्हणतील? लोकं नाव ठेवतील का? हेच विचार असतात ते पुढील काळामध्ये बदलणे गरजेचे आहे.
५) विवाह प्रसंगी केवळ इज्जत, पत, समाजाचा विचार करून आपली ऐपत नसताना *ऋण काढून सण* साजरा करणे हे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शोभत नाही.
५) लग्नप्रसंगी होणारे मंत्रोच्चार सप्तपदी, होम हवन या गोष्टी आपल्या हिंदू संस्कृतीला उजाळा देणाऱ्या असतात. तो आपल्या संस्कृतीचा एक वारसा आहे. थोरा-मोठ्यांच्या आशिर्वादाने संपन्न झालेले लग्न टिकून ठेवण्याचे जबाबदारी ही त्या वधू-वराच्या कुटुंबावर आणि मुख्यता वधू-वरांच्या बदलत्या मानसिक, सामाजिक, शारीरिक, वैचारिक आणि आर्थिक प्रगल्भतेवर अवलंबून आहे हा विचार होणे गरजेचे आहे.
६) विवाह ही एक संस्कृती आहे एक संस्कार आहे. त्यामुळे त्यातील अनाठायी, अनावश्यक, अतिरेकी खर्चावर केवळ करोना काळातच बंधन न घालता पुढील भविष्याचा विचार करून बंधने घालणे गरजेचे आहे.
प्रा. विद्या संतोष होडे
(एम ए. एम एड.डीएसएम,बीजे-प्रिंट मीडिया )
Comments
Post a Comment