अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर...

 अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर...

 आधी हाताले चटके मग मिळते भाकर........

       या बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेच्या ओळी  जीवनाचा खरा अर्थ सांगून जातात.

    आज लॉकडाऊन स्पेशल मध्ये चुलीवर स्वयंपाक करताना मला सतत या ओळी आठवत होत्या.

   आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये कधीही न येऊ असा निवांतपणा लॉकडाऊन मुळे मिळाला. लहानपणी गावाकडे अनुभवलेली चुलीवरच्या जेवणाची चव खूप वर्षांनी अनुभवता आली.

    चुलीवरचे गरमागरम जेवण म्हणजे नक्की काय?  तर संपूर्ण आयुष्याचा सार आहे.

    चुलीमध्ये सतत लाकडे टाकून चूल पेटवावी लागते. सगळीच लाकडे मोठी घालून चालत नाही काही छोट्या-छोट्या काटक्या, पालापाचोळा, एखादे मोठा लाकूड अशी त्या सरपणा मध्ये विविधता असेल तरच चूल चांगली पेटते. आपल्या आयुष्यातही असंच आहे ना! नेहमीच स्वतःच खरे म्हणून कसं चालेल कधीतरी कमीपणा घ्यावा लागतो, कधी माघार घ्यावी लागते, तर कधी सरशी घेऊन पुढे व्हावंच लागत.

      चुलीवर स्वयंपाक करताना भांड्याचं बूड हे नेहमी जाडच असावं लागतं.

    तसंच आपल्या आयुष्यात येणाऱ्या संकटांना आपल्याला मन खंबीर करून सामोरं जावं लागतं. प्रसंगी कठोर होऊन परिस्थितीचा सामना करून मार्ग काढावा लागतो.

     आता प्रश्न येतो तो चुलीवरच्या गरमागरम  जेवणाच्या चवीचा...... ती अवीट गोडी अनुभवण्यासाठी विस्तवाचे चटके सहन करणे गरजेचेच आहे.

      आपल्या आयुष्यातही निखळ आनंद मिळवण्यासाठी आपल्याला असे चटके सहन करावेच लागतात. चटके सहन केले नाही तर त्या चवीचा आनंद ही नाही आणि पोटभर तृप्त जेवल्याची भावनाही नाही.

लेखन :: प्रा. #विद्या_संतोष_होडे

हडपसर विधानसभा समन्वयक-शिवसेना

संस्थापक अध्यक्ष- #सावी_बहुउद्देशीय_सामाजिक_संस्था


Comments

Popular posts from this blog

प्रा. विद्या संतोष होडे

सावी

तुझ्या विना जाऊ शरण कुणा ?