मन करा रे प्रसन्न
लेख: मन करा रे प्रसन्न
10 ऑक्टोबर #जागतिक_मानसिक_आरोग्य_दिन
आरोग्य ही बहुआयामी संकल्पना आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असणारी व्यक्ती जीवनात यशस्वी होऊ शकते. प्राचीन काळापासून *शरीर खलु धर्म साधनम्* *आरोग्यम् धनसंपदा* यांसारख्या सुभाषितांद्वारे आरोग्याचे महत्त्व पटवून देण्यात आले आहे.
षडरिपूवर नियंत्रण प्राप्त झाले की सुखी जीवन जगता येते. केवळ शारीरिकदृष्ट्या सुदृढ असणे म्हणजे उत्तम आरोग्य नाही तर मानसिक दृष्ट्या संतुलित, नियंत्रित असणे याला आजच्या धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या युगामध्ये महत्त्व प्राप्त झाले आहे.
या *मना* ला अनुसरूनच मराठी भाषेमध्ये अनेक म्हणी आहेत.
*मन चिंती ते वैरी न चिंती*
*मन मोकळे करणे*
*मनास लावून घेणे*
*चोराच्या मनात चांदणे*
*मनी वसे ते चित्ती दिसे*
*मन भरून येणे*
*मनात मांडे खाणे*
*मनात घर करणे*
व्यक्तिमत्त्वाचा समतोल व एकात्म विकास साधणे, आपल्याजवळील समायोजनक्षमतेव्दारे जीवन अधिकाधिक कार्यक्षम करणे, मन निरोगी व विकसनशील ठेवणे या सर्व बाबी मानसिक आरोग्याशी संबंधित आहेत.
*Mental hygiene is a science and art of avoiding mental illness and preserving mental health*
कोरोना या महामारी मुळे मनुष्याच्या जीवनामध्ये आर्थिक,सामाजिक सांस्कृतिक, कौटुंबिक अशा सर्वच स्तरावर अमुलाग्र बदल झाला आहे. एका नव्या जीवनशैलीला, जीवनपद्धतीला अंगीकारून घेणे ही काळाची गरज बनली आहे. सहा महिन्यापेक्षाही अधिक काळ मनुष्य हा बंदिस्त वातावरणामध्ये जगत आहे. अशावेळेस कुटुंबातील आबालवृद्धांचे तसेच नोकरदार व्यक्तीचे, महिलांचे सर्वांचेच मानसिक आरोग्य चांगले रहाणे गरजेचे झाले आहे . वर्तमानपत्र उघडले असता मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या आकडेवारीमुळे भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. जीवनाच्या क्षणभंगूरतेमुळे सर्वांच्या मनावर एक दडपण आल्यासारखे झाले आहे. त्यातच आर्थिक अडचणीमुळे कुटुंबप्रमुखाच्या मानसिक स्थिती वर झालेला परिणाम, मुलांच्या ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या मनावर झालेला परिणाम या सर्वांचा संबंध मानसिक आरोग्य असंतुलित होण्याशी आहे.
या दृष्टीने आजचा हा *मानसिक आरोग्य दिन* आपण एका नव्या सकारात्मकतेने साजरा करणे गरजेचे आहे . मानसिक आरोग्य जपण्यासाठी आपण सर्वांनीच काही बाबींचे पालन करणे आवश्यक आहे.
*आरोग्यविषयक चांगल्या सवयी*
१) लवकर उठा लवकर निजा
२) व्यायाम योगासने प्राणायाम
३) पोषक व समतोल आहार
४) वेळेवर आहार घेणे.
५) पुरेशी विश्रांती
*कौशल्य व गुणवत्ता विकास*
१) स्वतःला ओळखणे.
२) मिळालेल्या वेळेचा आपल्या आवडी छंद कला जोपासण्यासाठी सदुपयोग करणे.
३) स्वतःच्या गुणांबरोबर दोषांचा स्वीकार करणे.
४) शत्रुसंधो तंत्र SWOT
*शक्तिस्थळे strenth*
*त्रूटी weakness*
*संधी opportunity*
*धोके Threats*
५) प्राप्त परिस्थितीचा समग्र विचार करणे.
६) स्पर्धेला सकारात्मक दृष्टीने घेणे. प्रसन्न मनाने येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाणे.
७) पालकांना समजून घेणे त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे.
*आर्थिक उत्पन्न व गरजा*
१) तडजोड करणे
२) आर्थिक उत्पन्न व गरजा यांचा योग्य मेळ घालणे.
३) इतरांशी तुलना करून सतत असमाधानी राहणे टाळणे.
४) इतरांशी बरोबरी करण्याच्या नादात होणारा अनावश्यक खर्च टाळणे.
बदल हा निसर्गाचा नियम आहे अश्मयुगापासून ते आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात पर्यंत प्रत्येक टप्प्यामध्ये परिवर्तन होत मानवी जीवन टिकून राहिलेले आहे. पुढील काळातही निसर्गनियमाप्रमाणे परिवर्तन हे होतच राहणार आहे त्यामुळे पुढील संभाव्य धोके, संधी यांचा उपयोग करून घेऊन आपल्या जीवनामध्ये आवश्यक बदल करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे.
*सर सलामत तो पगडी पचास* या उक्तीप्रमाणे आज आपले जीवन सुरक्षित राहिले तर आपण आयुष्यात अनेक यशाचे टप्पे, यशस्वी ध्येय साध्य करू शकतो.
लेखिका: प्रा. #विद्या_संतोष_होडे
एम ए एम एड, डीएसएम, बॅचलर इन जर्नालिझम

Comments
Post a Comment