महात्मा गांधी आणि शिक्षणाचा कार्यवादी दृष्टीकोण
गांधीजींचे जीवन व कार्य यांचा परिचय नसलेली व्यक्ती अपवादभूतच !
गांधीजी हे केवळ राजकीय पुढारीच नव्हते .धर्म, समाजकारण, अर्थकारण, हरिजनोद्धार, साहित्य, कला, ब्रह्मचर्य , निसर्गोपचार अशा जीवनाच्या सर्वच क्षेत्रात सखोल चिंतन व प्रत्यक्ष प्रयोग करून त्यांनी त्या क्षेत्रातील समस्यांवर प्रकाश टाकला. मौलिक व अभिनव विचारसंपदा प्रकट केली. शिक्षणाचे क्षेत्र अर्थातच त्यातून वगळले गेले नाही. त्यांनी शिक्षणासंबंधी केवळ विचारमंथनच केले असे नव्हे तर संपूर्ण शिक्षण योजना देशाला सादर केली. एक थोर शिक्षणतज्ञ म्हणून महात्मा गांधीजींचा परिचय व्हावा हा या लेखनामागील उद्देश...
महात्मा गांधीजींच्या मते केवळ साक्षरता म्हणजे शिक्षण नव्हे. आत्मा व मन यांचा परिपूर्ण विकास करून व्यक्ती मधील सर्वोत्कृष्ट गुणांची अभिव्यक्ती करणे हे शिक्षणाचे खरे ध्येय 3H - Head, Heart and Hand बुद्धी, भावना आणि हात यांचा संगम म्हणजेच शिक्षण ही संकल्पना गांधीजींनी मांडली.
महात्मा गांधीजींनी सर्वांगीण विकासात अध्यात्मिक विकासाला सर्वोच्च स्थान दिले. 1920 साली गुजरात विद्यापीठाची स्थापना करताना *सा विद्या या विमुक्तये* या ब्रीदवाक्याची त्यांनी सूचना केली.परंतु त्यांची आध्यात्मिक विकासाची किंवा ईश्वर उपासनेची कल्पना वैयक्तिक मुक्ती किंवा मरणोत्तर मोक्षापुरती निगडित नव्हती. *जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा* असे ते मानत. *वैष्णव जन तो तेने कहिये जो पीर पराई जाने रे* हे त्यांचे आवडते भजन. आजच्या शिक्षण पद्धतीचा विचार करताना पालक व विद्यार्थी यांच्यामध्ये होणारे कलह, मित्रा मित्रांमधील शुल्लक वादाचे रूपांतर मारामारी, खून अशा टोकाच्या निर्णयात होणे या बदलत्या मानसिकतेचा विचार करत असताना विद्यार्थ्यांच्या मध्ये समोरच्याच्या भावना जाणून घेणे, एकमेकांशी तसेच शिक्षकांशीं सद्वर्तन करणे आपुलकीचे जिव्हाळ्याचे नाते निर्माण करणे सामाजिक कर्तव्याची जाणीव होणे या गोष्टी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणे गरजेचे आहे. आपल्या भावनांचे योग्यरीत्या उदात्तीकरण करणे व समोरच्या व्यक्तीच्या भावना जाणून घेणे या गोष्टी शिक्षणातून मिळणे गरजेचे आहे. हाच विचार महात्मा गांधीजींनी त्यांच्या शैक्षणिक विचारांमध्ये मांडला.
बुद्धीचा विकास केवळ पुस्तकाच्या अभ्यासातून होणार नाही तर बौद्धिक विकासाला कृतिशीलतेची जोड देणे गरजेचे आहे,असे गांधीजी सांगत. *कृतीतून ज्ञान निर्मिती* होते असे गांधीजी सांगत.
कोरोना या महामारीच्या काळामध्ये बदललेल्या आर्थिक, सामाजिक जीवनाचा विचार करत असताना शिक्षण हे जीवनोपयोगी असले पाहिजे या गांधीजींच्या विचारांचा पुन्हा एकदा प्रत्यय येतो. ज्या शिक्षणातून मानवाला पायावर उभे राहण्याचे, पोट भरण्याचे सामर्थ्य निर्माण होते ते खरे शिक्षण. त्या दृष्टिकोनातून महात्मा गांधींजींनी मुलोद्योगी शिक्षणाची योजना मांडली. महात्मा गांधीजींनी शिक्षणाचे माध्यम मातृभाषा असावे यावर प्रामुख्याने भर दिला. Learning व Earning बरोबरच व्हावे हा दृष्टिकोण आता मूळ धरताना दिसत आहे.शिक्षणाला पुस्तकी अभ्यासक्रमाच्या जोखडातून बाहेर काढून त्याला कृतीची व व्यावसायिक शिक्षणाची जोड देऊन जीवनाभिमुख, समाजाभिमुख करण्याचे, शिक्षणात श्रमनिष्ठेला प्रतिष्ठा प्राप्त करून देऊन श्रमजीवी व बुद्धिजीवी वर्गातील अंतर दूर करण्याचा कार्य महात्मा गांधीजींनी केले. महात्मा गांधीजींनी मांडलेले शैक्षणिक विचार आजच्या काळातही शिक्षण क्षेत्राला दिशा देणारे आणि समाजाला व्यवसायिक, सामाजिक दृष्टीने उन्नत करणारेच आहेत.
प्रा विद्या संतोष होडे
हडपसर विधानसभा समन्वयक शिवसेना महिला आघाडी
एम ए एम एड. डी एस एम. बी जे (प्रिंट मीडिया)
संस्थापक अध्यक्षा: सावी बहुउद्देशीय सामाजिक संस्था

Comments
Post a Comment